चाकूसे काट डालेंगे म्हणत पोलिसालाच दिली धमकी!

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरेा) : शहरात कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल उपस्थित करणारी घटना हर्सूल परिसरात उघडकीस आली आहे. रस्त्याच्या मधोमध क्रूझर उभी करून वाहतूक कोंडी करणार्‍याला पोलिसांनी हटकताच त्याने उलट धमकावत धक्काबुक्की केली. हम नगरसेवक के लोग है... तुझे चाकू से काट डालूंगा, अशी धमकी देत त्याने रस्त्यावर नंगानाच घातला. १८ मार्चला दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रूझर गाडी (एमएच २०, ईई ५३३२) चालक आणि त्याच्यासोबतच्या एकाचा आरोपींमध्ये समावेश आहे.
अंमलदार मोहन सिंगल (३७) हे गस्तीवर होते. परत येत असताना हर्सूल टी-पॉइंटवरील बसस्टॉपसमोर एक क्रूझर गाडी (एमएच २० ईई ५३३२) रस्त्याच्या मधोमध उभी असल्याचे सिंगल यांना दिसले. त्यांनी चालकाला वाहन बाजूला घेण्यास सांगितले असता, चालकाने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हम नगरसेवक के लोग है, तूम बहोत मस्ती मे आए है, तुमको देखना पडेगा असे म्हणून त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी साथीदार क्रूझरमधून खाली उतरला आणि सीपी साहब को मिलकर तेरी वर्दी उतार दुंगा, मैं तुझे चाकू से काट डालूंगा असे म्हणून आरडाओरड करू लागला. रस्त्यावर गोंधळ नको म्हणून पोलिसांनी या प्रकरणी ठाण्यात जाऊन संबंधित क्रूझर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस हवालदार पोपट दहिफळे करत आहेत.